पुरंदर रिपोर्टर live
पुणे : २५ मे
शहरात दिवसेंदिवस खून, हाणामारी, अत्याचार आणि गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी (२५ मे) पहाटे पुण्यातील मंगळवार पेठेतील भीमनगर कमानीजवळ घडलेली गोळीबाराची घटना पुन्हा एकदा शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे पाचच्या सुमारास किरण केदारी, शाम गायकवाड, अश्पाक शेख आणि संतोष कांबळे हे चौघे मित्र भीमनगर कमानीजवळ उभे राहून गप्पा मारत होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेले आरोपी त्या भागात वारंवार फिरत होते. या संशयास्पद हालचालींवर चौघांनी त्यांना हटकल्याने आरोपी चिडले आणि त्यांनी थेट या तरुणांच्या दिशेने गोळ्यांचा मारा केला.
सुदैवाने या घटनेत कोणालाही गोळी लागली नाही. गोळीबाराची माहिती मिळताच फरासखाना पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून रोहित माने (वय ३२, रा. लोहियानगर) या सराईत गुन्हेगाराला अटक केली. त्याचप्रमाणे त्याचा साथीदार कासीम अन्सारी यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
या दोघांकडून एक पिस्तूल आणि काही जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
रोहित माने याच्यावर यापूर्वीही आर्म्स अॅक्ट, खुनाचा प्रयत्न, आणि मारहाण यांसारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत. तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील एक धोकादायक गुन्हेगार मानला जातो. सद्यस्थितीत फरासखाना पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखा या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत
0 Comments